झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्य़ातील घटना

रांची : झारखंडमध्ये पश्चिम  सिंगभूम जिल्ह्यात पाथलगढी चळवळीस विरोध करणाऱ्या सात ग्रामस्थांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

पोलीस महानिरीक्षक साकेत कुमार सिंह यांनी सांगितले की, सात ग्रामस्थांना ठार करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मंगळवारी बुरुगुलीकेरा खेडय़ात रात्रीच्यावेळी पोहोचले. ठार मारण्यात आलेल्यात पंचायत प्रतिनिधीचा समावेश आहे.

पोलिसांनी रात्रभर मृतांचा शोध घेतल्यानंतर सदर खेडय़ापासून चार किमी अंतरावर सात ग्रामस्थांचे मृतदेह सापडले. पाथलगढी चळवळीबाबत बैठक मंगळवारी घेण्यात आली होती, त्या वेळी काही वाद विवाद झाले त्यातून काही जणांनी विरोधाची भूमिका घेतली होती, असे पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक इंद्रजित महाता यांनी सांगितले. यानंतर पाथलगढी चळवळीच्या समर्थकांनी सात ग्रामस्थांचे अपहरण केले व त्यांना जवळच्या जंगलात नेले. तेथे त्यांना लाठय़ा काठय़ा व कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारण्यात आले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरन  यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, कुणालाही यात सोडून दिले जाणार नाही असे स्पष्ट केले. दरम्यान पोलीस या प्रकाराची चौकशी करीत असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

पाथलगढी चळवळीचा मुद्दा २०१९ च्या मध्यावधीत चर्चेस आला. त्यात १९ जून रोजी स्वयंसेवी संस्थेच्या पाच कार्यकर्त्यांचे अपहरण करण्यात आले होते, त्यातील महिलांवर सशस्त्र व्यक्तींनी बलात्कार केले. स्वयंसेवी संस्थांचे लोक झारखंडमधील खुंटी जिल्ह्य़ात पथनाटय़ करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या संस्थेच्या लोकांवर बाहेरचे म्हणून शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर २६ जूनला पाथलगढीच्या गटाने भाजपचे माजी खासदार कारिया मुंडा यांच्या खुंटी येथील निवासस्थानी बंदोबस्तास असलेल्या तीन सुरक्षा जवानांचे अपहरण केले, पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. पाथलगढी गट हे झारखंडमधील खुंटी, गुमला, सिमडेगा व पश्चिम सिंगभूम भागात कार्यरत आहेत. हे सर्व माओवादी जिल्हे आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर सोरेन यांनी पाथलगढी आंदोलकांविरोधातील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले होते. छोटा नागपूर भाडे कायदा व संथाल परगणा भाडे कायदा सुधारणांविरोधात पाथलगढी आंदोलकांनी निदर्शने केली होती.

पाथलगढीची प्रथा

झारखंडमध्ये पाथलगढी ही एक प्रथा आदिवासी समाजात आहे. त्यात दगड एका विशिष्ट ठिकाणी रोवले जातात व तेथे स्थानिक ग्रामपंचायतीचे स्वायत्त राज्य असते. त्या गावात बाहेरच्या व्यक्तींना येण्यास मज्जाव असतो. पाथलगढी प्रथेत ग्रामसभेला स्वायत्तता घेतली जाते. जेथे पाथलगढी लागू होते तेथे देशाचे कायदे लागू होत नाहीत. पाथलगढीकडून वने व नद्यांवरचा सरकारचा हक्क नाकारला जातो.