News Flash

पन्नाशीनंतरही महिलांसाठी सेक्स आवश्यकच; कोर्टाचा निकाल

७२ वर्षीय महिलेला न्यायालयीन लढाईत यश

प्रातिनिधीक छायाचित्र

वयाच्या पन्नाशीनंतरही महिलांना सेक्स आवश्यक असल्याचा निकाल युरोपमधील सर्वात मोठ्या मानवी हक्क न्यायालयाने दिला आहे. पोर्तुगालमधील मारिया इवोने कारवाल्हो डी सूजा या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. शस्त्रक्रियेनंतर सामान्य आणि लैंगिक जीवनात समस्या निर्माण होत असल्याने मारिया यांनी रुग्णालयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी मानवी हक्क न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

मारिया यांच्यावर वयाच्या ५० व्या वर्षी एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. १९९५ मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन आणि लैंगिक जीवनात अनेक अडचणी येत असल्याचे म्हणत मारिया यांनी पोर्तुगालमधील न्यायालयात रुग्णालयाविरोधात खटला दाखल केला. या प्रकरणी निकाल देताना पन्नाशीनंतर सेक्स आवश्यक नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. पोर्तुगीज न्यायालयाच्या या निर्णयाला मारिया यांनी फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग येथील युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आव्हान दिले. या खटल्यावर न्यायालयातील पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाने मारिया यांच्या बाजूने ३-२ असा निकाल दिला.

‘या प्रकरणात प्रश्न वयाचा किंवा सेक्सचा नाही, तर विचार पद्धतीचा आहे. ५० वर्षे वयाच्या महिलेलसाठी सेक्स तितकासा आवश्यक नसतो, हा विचारच चुकीचा आहे,’ असे युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने निकालात म्हटले. पोर्तुगालमधील न्यायालयाचा निकाल पूर्वग्रहदूषित असल्याचेदेखील मानवाधिकार न्यायालयाने म्हटले. ‘महिला आणि सेक्स यांचा संबंध केवळ संततीप्राप्तीसाठी आहे, अशी पोर्तुगालमधील न्यायालयाची समजूत आहे. सेक्समुळे महिलांना मानसिक आणि शारिरीक सुख मिळते, याचा विचार निकालावेळी करण्यात आलेला नाही,’ असे मानवाधिकार न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

‘मारिया शस्त्रक्रियेनंतर शारिरीकदृष्ट्या अतिशय कमजोर झाल्या. त्यातच पोर्तुगालमधील न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांना आणखी त्रास झाला,’ अशी माहिती मारिया यांच्या वकिलांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना दिली. पोर्तुगालमधील न्यायव्यवस्था पितृसत्ताक विचारांनी ग्रस्त असल्याचे निकालावेळी युरोपियन न्यायालयाने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 4:53 pm

Web Title: sex is important for women even after age of 50 years european human right court gives important verdict
टॅग : Relationship
Next Stories
1 गुजरातमध्ये काँग्रेसला गळती, आणखी दोन आमदारांचे राजीनामे
2 लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून गुन्हा दाखल
3 ‘छोट्या मोदीं’ची कमाल; ‘मिशन बिहार’ फत्ते
Just Now!
X