अत्यंत कडेकोट बंदोबस्तात शनिवारी सायंकाळी शबरीमलातील भगवान अय्यप्पा मंदिराचे दरवाजे मंडल-मकरविल्लाकू यात्रेकरिता दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कंदारारू महेश मोहनारारू यांनी मंदिरातील गाभारा उघडला आणि पूजा केली. या वेळी केरळ, तमिळनाडू आणि शेजारच्या अन्य राज्यांमधील भाविक मोठय़ा संख्येने हजर होते.

दुपारी दोन वाजता मंदिराच्या दिशेने जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर भाविकांनी हातात इरुमुदिकेत्तू (पूजाअर्चा करण्याचे साहित्य) घेऊन मंदिराच्या १८ पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी पुरोहितांना मंदिरात पाद्यपूजा केली. त्यानंतर ए. के. सुधीर नंबुद्री (शबरीमला) आणि एम. एस. प्रामेश्वरन नंबुद्री (मलिकापूरम) या नव्या पुरोहितांनी सूत्रे हाती घेतली.

सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय एलडीएफ सरकारने घेतला त्यानंतर राज्यात आणि मंदिराभोवती उजव्या संघटना आणि भाजपने उग्र निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली नाही. हे प्रकरण व्यापक पीठाकडे वर्ग केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार खबरदारी घेत आहे.

आंध्र प्रदेशातील १० महिलांना प्रवेशास मज्जाव

शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी आंध्र प्रदेशातून शनिवारी पांबा येथे आलेल्या किमान दहा तरुण महिलांना परत पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. विजयवाडा येथून ३० महिलांचा एक गट येथे आला होता आणि त्या महिला १० ते ५० वर्षे वयोगटातील होत्या.

पांबा येथे या महिला पोहोचल्या तेव्हा पोलिसांनी त्यांची ओळखपत्रे तपासली असता त्या बंदी घालण्यात आलेल्या वयोगटातील असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांना शबरीमालातील सद्य:स्थितीची माहिती देण्यात आली. त्यानंतर या महिला पुढे गेल्या नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.