CAA कायद्याविरोधात नवी दिल्ली येथील शाहीन बाग परिसरात झालेलं आंदोलन हे भाजपाने रचलेला कट होता अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाने केली आहे. CAA कायद्याला विरोध करत दिल्ली आणि नजिकच्या परिसरातील मुस्लीम नागरिकांनी शाहीन बाग येथे ३ महिने धरणं आंदोलनं केली. मात्र याच आंदोलनातील काही चेहरे भारतीय जनता पार्टीत सहभागी झाल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर निवडणुकीत मतांसाठी शाहीन बागचं आंदोलन घडवून आणल्याचा आरोप केला.

शाहीन बागचं आंदोलन सुरु असताना आम आदमी पक्षाने यापासून स्वतःला वेगळं ठेवलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांपासून इतर नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी एका कार्यक्रमात आम्ही शाहीन बागच्या लोकांसोबत आहोत असं म्हटलं होतं. “भाजपामधील सर्वोच्च नेत्यांनी शाहीन बाग आंदोलनात काय-काय होईल हा सर्व कट रचला होता. कोण काय बोलेल, कोण कोणावर हल्ला करेल, त्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल या सर्व गोष्टी आधीपासूनच ठरवल्या गेल्या होत्या”, भारद्वाज यांनी भाजपावर टीका केली. शाहीन बाग परिसरातील महिला वर्गही या आंदोलनात सहभागी झाला होता.

“शाहीन बाग परिसरातील १० महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांनी मार्ग अडवण्यास सुरुवात केली आणि दिल्ली पोलिसांनी हे होऊ दिलं. हेच दिल्ली पोलीस इतरवेळा विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी यांच्या मोर्च्याला परवानगी देत नाहीत. आंदोलकांनी त्या ठिकाणी तंबू उभारले तरीही पोलिसांनी काही केलं नाही. त्या काळात प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत होता. आंदोलन स्थळावर लोकांची ड्युटी लावण्यात आली होती. काही लोकं तिकडे रोज सकाळ-दुपार यायची, खायची-प्यायची आणि घरी जायची.” भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शाहीन बाग आंदोलनातील प्रमुख चेहरा असलेला शहजाद अली आणि इतर काही सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने भाजपावर घणाघाती टीका केली आहे. अमित शहा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान, ईव्हीएमवर कमळाचं बटण इतक्या जोरात दाबा की शाहीन बागपर्यंत त्याचा करंट पोहचला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. आता कमळाचे धागे हे कशा पद्धतीने शाहीन बागशी जोडले गेले आहेत हे दिसून येतंय असंही भारद्वाज म्हणाले.