वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे द्वारका-शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे एका कार्यक्रमात आलेल्या शंकराचार्यांनी मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यूंनी मोदींना शाप लागेल, असे वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नव्हे तर, ‘मोदीराज’ ब्रिटीशांच्या राजवटीपेक्षा भयंकर आहे, असेही ते म्हणाले.
शंकराचार्य यांनी यापूर्वी अनेक राजकीय प्रकरणांवर आपले मत मांडले आहे. ते काँग्रेसच्या जवळचे असल्याचे मानले जाते. नरसिंहपूरमध्ये कार्यक्रमासाठी गेलेल्या शंकराचार्यांना पत्रकारांनी नोटाबंदीविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मोदींनी घेतलेला हा निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय चुकीचा आहे. मोदी सेवक नाहीत, तर खलनायक आणि हुकूमशाहाची भाषा बोलत आहेत. ते स्वातंत्र्यापासूनचा हिशेब घेण्याची भाषा बोलत आहेत. हिशेब घेणे हे कायद्याचे काम आहे. अशी भाषा बोलणारे मोदी कोण आहेत. हा देश मोदींच्या हिशेबाने नव्हे तर राज्यघटनेच्या हिशेबाने चालेल, असेही ते म्हणाले.
मोदींचे राज्य हे ब्रिटीश राजवटीपेक्षाही भयानक आहे. लोकांना रांगेत उभे करणे ही लोकशाही नाही. लोकांना दुःखी करणे ही लोकशाही असूच शकत नाही. लोकांची रक्षा करण्याऐवजी ते त्यांचा पैसा आणि जीव घेत आहेत, असेही ते म्हणाले.