जनता दल युनायटेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी आपल्याला राम मंदिरासंबंधी काही श्रद्धा नाही, योगी आदित्यनाथ यांनी खुशाल घंटा बजवावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आपल्याला राम मंदिराशी काही देणं घेणं नाही. आपली राम मंदिरावर कोणतीही श्रद्धा नाही. मी फक्त जिवंत व्यक्तीची पूजा करतो’, असं शरद यादव बोलले आहेत. पुढे बोलताना घंटा बडवणं योगी आदित्यनाथांचं काम आहे, त्यांनी ती खुशाल बडवावी असंही म्हटलं आहे.

आपल्या या वक्तव्याला शरद यादव यांनी संविधानाचा आधार दिला आहे. ‘जेव्हा संविधानातच लिहिलेलं नाही तर मी पूजा का करायची. संविधानात पूजा करण्यासंबंधी काही लिहिलेलं नाही. संविधानात या गोष्टींना काही अर्थ नाहीये’.

शरद यादव यांच्या राम मंदिरासंबंधी वक्तव्याने खळबळ माजली आहे. शरद यादव म्हणाले की, ‘मंदिराशी आमचा काही संबंधी नाही. आम्ही जिवंत व्यक्तीला पूजतो. आमचा मंदिराशी काही संबंध राहत नाही आणि याचा संविधानाशीदेखील काही संबंध नाही. रामाची जन्मभूमी असल्याने तुमची श्रद्धा असेल, आमची नाही. यामध्य हरकत काय आहे. तुम्हीदेखील जिवंत आहात, आम्हीही जिवंत आहोत. योगींनी घंटा बडवावी, घंटा बडवणं त्यांचं काम आहे. संविधानात या गोष्टींना काही अर्थ नाही’.

पत्रकारांशी बोलताना पुढे त्यांनी सांगितलं की, ‘महायुतीचं नेतृत्व सामूहिक असणार आहे. त्यानंतरच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल’. शरद यादव यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत हे अत्यंत अस्थिर सरकार आहे. नोटाबंदी आणि जीएसटीने देशाला २० वर्ष मागे ढकललं आहे. बँकांना पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं आहे असं म्हटलं. यासोबत काश्मीरमधील परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad yadav controversy ram temple yogi adityanath
First published on: 27-06-2018 at 14:34 IST