केंद्र सरकारनं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना नवी दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. चीनबद्दल प्रश्न विचारल्यामुळे सरकारनं बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. याच प्रकरणावर लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयानं यासंबंधातील पत्र प्रियंका गांधी यांना दिले होते. सरकारच्या या निर्णयाबद्दल बोलताना शरद यादव म्हणाले, “प्रियंका गांधी यांना बंगला रिकामा करायला सांगण, याला मी सूडाचं राजकारणच मानतो. सरकारनं असं करायला नको. त्यांनी आपली आजी व वडिलांना गमावलं आहे. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा करणं हे देशाचं कर्तव्यच आहे. या निर्णयाचा फेरविचार करायला हवा,” असं शरद यादव यांनी म्हटलं आहे.

गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयानं बुधवारी प्रियंका गांधी यांना नोटीस दिली. यात एका महिन्याच्या अवधीत दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला रिकामा करण्यात यावा, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत प्रियंका गांधी यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. केंद्राच्या निर्णयावर काँग्रेसकडूनही टीका करण्यात आली आहे. चीनला जागा रिकामी करायला सांगायची होती, मात्र, काँग्रेसला बंगला रिकामा करायला सांगण्यात आलं, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.