पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाने इतर प्रतिस्पर्धी पक्षांवर मात केली असून ते आता तिसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास नवाझ शरीफ सज्ज आहेत. तालिबानच्या धमक्या व बॉम्बहल्ले या वातावरणातही पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणात म्हणजे अंदाजे ६० टक्के मतदान झाले होते. आतापर्यंतच्या कलांचा विचार करता पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गट १२१ पेक्षा अधिक जागा मिळवणार हे स्पष्ट झाले असून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा तेहरीक ए इन्साफ व पाकिस्तान पीपल्स पार्टी हे दोन्ही पक्ष अनुक्रमे ३४ व ३२ जागा मिळवून मागे पडले आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ पक्षाने पुन्हा एकदा देशाची सत्ता मिळवली आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या या निवडणुकात जो हिंसाचार झाला, त्यात काल ५० जण ठार झाले होते. पाकिस्तानात एका नागरी सरकारकडून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्तेची सूत्रे जाण्याची ही पहिली वेळ आहे.
पाकिस्तानातील २७२ सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीत साधे बहुमत मिळवण्यास कुठल्याही पक्ष किंवा आघाडीस १३७ जागांची गरज आहे. इतर सत्तर जागा महिला व मुस्लिमेतरांसाठी राखीव असून त्या निवडणुकीतील कामगिरीनुसार विविध पक्षांना दिल्या जातील. जास्त लोकसंख्या असलेल्या पंजाब प्रांतात पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) गटाची सत्ता येणार हे स्पष्ट होत आहे. तेथील असेम्ब्लीच्या २९७ जागांपैकी १८८ जागांवर पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्ष आघाडीवर आहे. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टी व मुत्ताहिद्दा कौमी मूव्हमेंट यांची अनुक्रमे ६६ व १५ जागांवर आघाडी आहे. १३० सदस्यांच्या असेंम्ब्लीत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार येणार हे निश्चित होत आहे.
पाकिस्तानचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे मत शरीफ यांनी व्यक्त केले आहे. इमरान खान यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाच्या नेत्यांवर टीका केली होती त्यावर विचारले असता शरीफ म्हणाले, की आपण कुणाला शिवीगाळ केली नाही पण ज्यांनी आम्हाला शिवीगाळ केली त्यांना मात्र आपण माफ करतो. इमरान खानच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाशी कोणतीही आघाडी करण्याची नवाझ शरीफ यांची इच्छा नाही.