काँग्रेससहित अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी नागपुरात पोहोचले आहेत. गुरुवारी प्रणव मुखर्जी आरएसएस कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. प्रणव मुखर्जी कार्यक्रमात सहभागी होत असल्याने आता त्यांच्या मुलीनेही उघड नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे. ट्वि़टरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वडिलांना थेट सुनावलं आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी भाजपात प्रवेश करत असल्याचं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. यावरही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वक्तव्य केलं आहे. ‘आजच्या घटनेवरुन भाजपा किती घाणेरडं राजकारण करत आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल अशी अपेक्षा. तुमचं भाषण विसरलं जाईल, फक्त व्हिजुअल्स राहितील. खोटी वक्तव्यं जोडून तुमचे व्हिजुअल्स परसवले जातील’, असा थेट आरोपच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आरएसएसवर केला आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘नागपूरला जाऊन तुम्ही भाजपा आणि आरएसएसला खोट्या बातम्या पेरण्याची आणि अफवा पसरवण्याची संधी देत आहात. ही फक्त सुरुवात आहे’.

प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास होकार दिल्यापासूनच वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या निर्णयानंतर काँग्रेस पक्षात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आता प्रणव मुखर्जी आरएसएसच्या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

प्रणव मुखर्जी दोन दिवस राजभवनात थांबणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी वैचारिक मतभेद असल्याने आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचं आवाहन प्रणव मुखर्जींना केलं होतं. यानंरही त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही.

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिक्षा उत्तीर्ण होणारे पुढे जाऊन पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करतात. या वर्गात देशभरातून ८०० तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.