काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजीसाठी ओळखले जातात. जगभरातील फॉलोअर्सच्या ज्ञानामध्ये थरूर ट्विटरवरुन भर टाकत असतात. अनेकदा थरूर ट्विटरवरुन व्यक्त होताना असे काही इंग्रजी शब्द वापरतात की जे अनेकांनी पूर्वी ऐकलेले किंवा पाहिलेले नसतात. मात्र थरूर यांच्या याच भाषाविषयक ज्ञानाचा आधार घेत एका मोबाइल अ‍ॅप कंपनीने थरूर यांच्याप्रमाणे इंग्रजी आम्ही शिकवतो असा दावा केलाय. विशेष म्हणजे या कंपनीने आपल्या अ‍ॅपच्या जाहिरातीमध्ये थरूर यांचा फोटो आणि नावही वापरलं आहे. मात्र यावरुन आता थरूर यांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

थरूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अ‍ॅपच्या जाहिरातीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय. यामध्ये स्क्रीनशॉर्टमध्ये ब्लॅकबोर्ड रेडिओ (बीबीआर) नावाच्या अ‍ॅपची जाहिरात दिसत आहे. या जाहिरातीमध्ये थरूर यांचा फोटोही असून त्यांच्याप्रमाणे उत्तम इंग्रजी बोलण्याचं प्रशिक्षण आम्ही देतो असा दावा जाहिरातीत कंपनीने केलाय.

थरूर यांनी हा स्क्रीनशॉर्ट शेअर करत या कंपनीला इशारा दिलाय. “या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी माझ्या निर्दर्शनास ही गोष्ट आणून दिलीय. माझा या अ‍ॅपशी काहीही संबंध नाहीय असं मी इथे स्पष्ट करु इच्छितो. तसेच मी या अ‍ॅपला कोणत्याही प्रकारे पाठिंबा दर्शवलेला नाही. आर्थिक फायद्यासाठी माझं नाव आणि फोटो वापरल्याप्रकरणी मी या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे,” असं थरूर यांनी म्हटलं आहे.

थरुर हे अनेकदा त्यांच्या ट्विटमधील शब्दांमुळे चर्चेत असले तरी सध्या मात्र हे या स्पष्टीकरणामुळे चर्चेत असल्याचं चित्र दिसत आहे.