भाजपावर नाराज असलेले पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत टीका केली आहे. त्यांनी वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ कार्यक्रमात मोदींनी केलेल्या भाषणावर हल्लाबोल करताना भारताच्या जनतेला भाषण नकोय तर रेशन हवंय असं म्हटले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. ते म्हणाले, माननीय पंतप्रधान महोदय! तुम्ही लंडनमधील वेस्टमिनिस्टरमध्ये चांगले भाषण दिले. जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्केस्ट्रेटेड, कोरियॉग्राफ्ड आणि स्क्रिप्टेड होते. पण भारताच्या जनतेला भाषण नकोय, रेशन हवंय, ते देण्यास तुम्ही सक्षम आहात. वेळ संपत आलीय. पण माझ्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहेत. जय हिंद!

तत्पूर्वी, शुक्रवारी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी मोदींवर निशाणा साधला होता. विदेशातून परत आल्यानंतर माध्यमं (सरकारी दरबारी वगळता) आणि देशाला प्रामाणिक आणि पारदर्शी पद्धतीने सामोरे जाण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे. लोक तुमच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत.. मार्गदर्शक मंडळाची (अनुभवी राजकीय नेत्यांचे वृद्धाश्रम) नाही. आणि शेवटी किमान तुम्ही बोला सर, असे उपहासात्मक ट्विट त्यांनी केले होते.

दरम्यान, पाटणा येथे आयोजित राष्ट्रमंच अधिवेशनात शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी या मंचावरून लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे कौतुक केले. त्यांच्यासारखं वक्तृत्व असलेला देशात सध्या तरी दुसरा युवा नेता नसल्याचे त्यांनी म्हटले.