सोमनाथ मंदिरातील वादानंतर राहुल गांधी हे ‘जानवेधारी हिंदू’ असल्याचा कंठशोष करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्या रविवारी वडोदरा येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, राहुल गांधी हे शिवभक्त असल्याचा दावा काँग्रेस नेते करतात. मात्र, शिवभक्त असलेल्या राहुल यांचा भगवान रामावरही तितकाच विश्वास आहे का, असा सवाल लेखी यांनी विचारला. गुजरात काँग्रेसकडून ट्विटरवर नुकताच राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करण्यात आला होता. या फोटोत राहुल गांधींनी कपड्याच्यावरून जानवे घातल्याचे दिसत आहे. यावरूनही मिनाक्षी लेखी यांनी काँग्रेसला टोला लगावला. राहुल गांधी हे कपड्यांच्यावरती जानवे घालणारे एकमेव ब्राह्मण असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपच्या प्रचाराला धार्मिक धार

जानवेधारी ब्राह्मण स्वत:ला शिवभक्त म्हणवतात. अशावेळी त्यांनी भगवान रामाविषयीचा दृष्टीकोनही स्पष्ट करायला हवा. त्यांच्या (काँग्रेस) सरकारने राम अस्तित्त्वातच नसल्याचा दावा केला होता. महापुरूषांच्या सांगण्यानुसार राम हा शिवभक्त होता व त्याने लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्यापूर्वी शिवाची आराधनाही केली होती. मात्र, काँग्रेसच्या मते रामसेतू हा अस्तित्त्वातच नाही. त्यामुळे राहुल गांधींनी भगवान रामाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मिनाक्षी यांनी केली. जेणेकरून राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराविषयी काय विचार करतात, हे समजेल. तसेच त्यांनी २००२ साली गोध्रा येथे झालेल्या कारसेवकांच्या कत्तलीविषयी भाष्य करावे, असे मीनाक्षी लेखी यांनी म्हटले.

अमित शहा जैन असूनही स्वतःला हिंदू म्हणवून घेतात, काँग्रेसची खोचक टीका