प्रभू रामचंद्राच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत. तसंच राम मंदिराचा मुद्दा आम्ही कधीही राजकीय मुद्दा म्हणून समोर आणला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अयोध्येत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या विजयी खासदारांसह रविवारी उद्धव ठाकरे रामलल्लाच्या दर्शनाला येणार आहेत. त्याच संदर्भातली माहिती देण्यासाठी ही पत्रकर परिषद आयोजित करण्यात आली होती. रविवारी उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे १८ खासदारही असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर इथे येणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते इथे येणार आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे असंही संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. भाजपा आणि एनडीएला बहुमत मिळालं आहे हा आम्ही प्रभू रामचंद्राचा आशीर्वादच समजतो. आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच सुप्रीम कोर्टाच्या ठिकाणी आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. समान नागरी कायदा आणला जावा, कलम ३७० हटवलं जावं आणि राम मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू व्हावं या आमच्या मुख्य मागण्या आहेत. देशाला अमित शाह यांच्या रूपाने एक सक्षम गृहमंत्री मिळाले आहेत त्यामुळे हे प्रश्न सुटतील असेही संजय राऊत यांनी म्हटले.

‘पहले मंदिर फिर सरकार’ हा नारा आम्हीही दिला होता, मात्र पुलवामा येथे आपल्या जवानांवर हल्ला करण्यात आला. देशाची सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने राम मंदिर निर्मितीचा मुद्दा आम्ही बाजूला ठेवला होता. आता मात्र स्पष्ट बहुमत मिळालं आहे केंद्रात मोदी सरकार आहे. हे सरकार राम मंदिराची निर्मिती नक्की पूर्ण करेल असा विश्वास वाटतो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या उद्धव ठाकरे सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेतील, त्यांच्यासोबत शिवसेनेचे विजयी खासदार असतील असंही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याने या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे असंही राऊत यांनी सांगितलं.