जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका मोठ्या कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी त्यांनी कलम ३७० वर भाष्य केलं. “जे लोकं आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत त्यांनी एक गोष्ट समजली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही १९४७ मध्येच गेलो असतो. हा आमचा भारत आहे. परंतु हा महात्मा गांधी यांचा भारत आहे भाजपाचा नाही,” असं फारुख अब्दुल्ला कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले. तसंच जम्मू काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हवं असल्यास फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावं,” असं ते म्हणाले.

आणखी वाचा- पाकिस्तानात जायचं असतं तर…कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला

“जर फारूख अब्दुल्लांना हवं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं आणि तिकडे कलम ३७० लागू करावं, भारतात कलम ३७० आणि ३५ ए ला कोणतीही जागा नाही,” असं संजय राऊत म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याची मागणी कोणताही राष्ट्रभक्त करणार नाही. अशी वक्तव्य करणाऱ्यांची डीएनए चाचणी केली गेली पाहिजे. फारुख अब्दुल्लांना देशातून बाहेर पडून पाकिस्तानात स्थायिक व्हायचंय का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

“कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील इतर भागातील उद्योजकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता या ठिकाणी उद्योगांना गती मिळेल. लोकांना रोजगार मिळून जनताही मुख्य प्रवाहात येईल,” असंही राऊत म्हणाले.

आणखी वाचा- एक वेळ असेल जेव्हा सरकार लोकांसमोर हात जोडून उभं असेल; मेहबुबा मुफ्तींची टीका

काय म्हणाले होते अब्दुल्ला?

“आम्हाला पाकिस्तानात जायचं असतं तर आम्ही १९४७ मध्येच गेलो असतो. त्यावेळी आम्हाला थांबवणारं कोणीही नव्हतं. परंतु आम्ही भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि हा देश आमचा आहे. आमचा देश हा महात्मा गांधींचा देश आहे, भाजपाचा नाही,” असंही फारूख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी अब्दुल्ला यांनी भाजपा देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला. तसंच भाजपाकडून जम्मू काश्मीरसह लडाखमधील लोकांना खोटी आश्वासनं दिली जात असल्याचंही म्हटलं. “मी आपल्या लोकांना अधिकार पुन्हा मिळवून दिल्याशिवाय मरणार नाही. मी या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलो आहे. ज्या दिवशी माझं काम पूर्ण होईल त्या दिवशी मी या ठिकाणाहून निघून जाईन,” असंही अब्दुल्ला यांनी नमूद केलं.