एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र चव्हाण यांनी आता आपल्या बचावासाठी थेट एअर इंडियाच्या सेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रवींद्र गायकवाड यांनी शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर पत्र लिहून आपली बाजू मांडली. या पत्रात गायकवाड यांनी एअर इंडियाकडून देण्यात येणाऱ्या सेवेच्या दर्जाविषयी काही सवाल उपस्थित केले आहेत. या सगळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीही नेमण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी पत्रात केली आहे. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या विमानांमध्ये टिव्ही, टॉवेल आणि टिश्यू पेपरची सुविधा देण्यात येते. मग देशांतर्गत विमानाप्रवासात या सेवा का पुरवण्यात येत नाहीत, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच गायकवाड यांनी विमानात आपल्याशी उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्याचीही तक्रार केली आहे.

मी बिझनेस क्लासचे तिकीट काढूनही विमानामध्ये बसल्यानंतर संपूर्ण विमानच इकॉनॉमी क्लासचे असल्याचे माझ्या लक्षात आले. मी याबाबत चौकशी केली असता गेल्या एक वर्षापासून असाच प्रकार सुरू असल्याचे उत्तर मला अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. आम्ही बिझनेस क्लासचे तिकीट काढूनही बिझनेस क्लासची सेवा का दिली जात नाही, असा सवाल मी त्यावेळी विचारला. तेव्हा एक अधिकारी मला म्हणाला की, खासदार-व्हीआयपी काही नाही, तुम्ही खाली उतरा. मी मोदींकडे तुमची तक्रार करेन, असा साद्यंत वृत्तांत गायकवाड यांनी पत्रात नमूद केला आहे. गायकवाड यांनी शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार अनिल देसाई आणि वकिलांशी बोलून या पत्राचा मसुदा तयार केला.

आपण पैसे न देता विमानप्रवास करत आहोत का? एअर इंडियाच्या ढिसाळ कारभाराकडे, विमानांच्या वेळा न पाळल्या जाण्याकडे आणि एअर इंडियाच्या तोट्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी विमान कंपन्यांमध्ये नेमकी उलट परिस्थिती आहे. मग, असा फरक का केला जातो. त्या कंपन्यानांही सरकारकडूनच परवाना दिला जातो. मग एअर इंडियाचीच अवस्था अशी का? या सगळ्याची उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवींद्र गायकवाड यांनी केली आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : ‘एफआयए’) रवींद्र गायकवाड यांच्यावर हवाईप्रवास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याला तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

‘आम्ही खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न : ‘कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउटिंग टू मर्डर’) आणि ३५५ (गुन्हेगारी हेतूने अप्रतिष्ठा) नुसार गुन्हा दाखल केला आणि सखोल चौकशीसाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (क्राइम ब्रँच) सोपविला आहे,’ अशी माहिती दिल्ली पोलिसाचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी रात्री पत्रकार परिषदेमध्ये दिली.