बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? स्पष्टच सांगायचं तर बिहारला भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे. त्यात नितीशकुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे, असं म्हणत शिवसेनेनं नितीश कुमार यांच्यावर टीका केली.

तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल. जदयू पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे. भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकडय़ांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता ३१ वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. तेजस्वी यांचा राष्ट्रीय जनता दल बिहारातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हे भाग्य भाजपस लाभले नाही. त्यामुळे सत्ता राखली याचा आनंद जरूर साजरा करता येईल, मात्र विजयाचा शिरपेच तेजस्वी यादवच्याच डोक्यावर आहे.

भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे. त्या सरशीसाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल. ओवेसी हे मोदी पिंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारातही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान १५ उमेदवार पराभूत झाले. या १५ जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली. चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले.

चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली. आता काही काळासाठी नितीशकुमार यांची वरात काढून त्यात ‘घोडे’ नाचवले जातील, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे, हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. खुर्चीवर नितीशकुमारांना बसवून ‘बादशाही’ची सूत्रं भाजपच्याच हाती ठेवली जातील

तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे.