लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही दणदणीत विजय मिळवला असला तरी राज्यात सत्तांतर झाल्यास मुख्यमंत्री आमचाच असेल, असा दावा शिवसेनेने मंगळवारी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही स्पष्टोक्ती करतानाच स्वतंत्र विदर्भाची शक्यताही धुडकावली. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे दोन तुकडे होऊ देणार नाही, असे त्यांनी बजावले.
काँग्रेसविरोधी वातावरणात आलेल्या मोदीलाटेत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म निभावला. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वाभाविकपणे शिवसेनेला मिळाले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य त्यांनी काही दिवासांपूर्वी केले होते.  
रालोआच्या बैठकीसाठी सहकुटुंब दिल्लीत आलेल्या उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात मोदी लाट असल्याचे मान्य केले असले, तरी शिवसेनेला मिळालेल्या यशाचे खरे शिल्पकार केवळ बाळासाहेब ठाकरे असल्याचे सांगण्यास उद्धव विसरले नाहीत.
विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या जागावाटपात आजवर कुठेही तणाव निर्माण झालेला नाही. त्यामुळे यापुढेही जागावाटपाचे समीकरण पूर्वीसारखेच राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
कराच्या पटीत मदत हवी
केंद्रात अस्तित्वात येणाऱ्या रालोआ सरकारकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत. मुंबई व महाराष्ट्राकडून जितका कर केंद्राच्या तिजोरीत जमा होतो, त्या पटीत मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली.
गारपिटग्रस्तांना तातडीचा आधार
राज्यात गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी महायुतीच्या खासदारांकडून करण्यात येईल. याशिवाय तातडीने काही उपाययोजना सुचविण्यात येतील, असे उद्धव ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
वीज हवी पण जैतापूर नको!
जैतापूर प्रकल्प भलेही चांगला असेल, पण तो महाराष्ट्रात नको या आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. कोणत्याही राज्यात हा प्रकल्प स्थलांतरित करावा. महाराष्ट्र आवश्यक इतकी वीज त्या राज्याकडून खरेदी करील,  असे ठाकरे म्हणाले.