स्मार्ट सिटीवरून शिवसेना आक्रमक; विधानसभेत वादंग
स्मार्ट सिटीची ओळख असलेली बुलेट ट्रेन सुरू करण्यापूर्वी मुंबईत आधीच असलेल्या उपनगरी रेल्वे सेवा सुधारा अशी भूमिका शिवसेनेने सोमवारी घेतली. बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही, मात्र उपनगरी गाडय़ांमध्ये आधी योग्य सुविधा द्या, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान, नागपुरात स्मार्ट सिटी प्रकल्पावरून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही दंड थोपटून स्मार्ट सिटीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत अगोदर सहभागी होणाऱ्या आणि त्यासाठी ‘भाजप’ला साथ देणाऱ्या शिवसेनेने आता या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. स्मार्ट सिटीवरून सोमवारी दिवसभर विधानसभा सभागृहात व बाहेरही वादंग झाले.
मुंबई महापालिकेमध्येही या योजनेला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक झाल्याचे समजते. मंगळवारी पालिकेच्या सभेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
आमचा बुलेट ट्रेनला विरोध नाही पण जीवघेणा झालेला उपनगरी प्रवास, प्रचंड गर्दीमुळे दरवाजात लोंबकळणारे प्रवासी, त्यामुळे दरवाजातून पडून दररोज होणारे काही मृत्यू, फलाट आणि उपनगरी गाडी यातील अंतरामुळे होणारे अपघात हे प्रश्न मुंबईकर उपनगरी रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेनपेक्षा प्रवाशांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

मुंबईतही शिवसेनेचा विरोध
स्मार्ट सिटी योजनेचा प्रस्ताव पंधरा दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सेना-भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तेव्हा दोन्ही कॉंग्रेस व मनसेने याला विरोध केला होता. आता शिवसेनेने आपली भूमिका बदलली असून या योजनेला विरोध करण्याचे ठरविले आहे. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्मार्ट सिटी निधीच्या विनियोगासाठी केंद्र किंवा राज्य सरकार कंपनी (एसपीव्ही) स्थापन करणार नसून ते अधिकार महापालिकेलाच असतील. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल राबविले, तर खासगी कंपन्यांना किती प्रतिनिधित्व द्यायचे, याचेही अधिकार अधिकार त्यांच्याकडेच राहतील. सर्व राजकीय पक्षांना व स्थानिक स्वराज्य संस्थांना बरोबर घेऊनच पुढे जाणार आहे.
– मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस</strong>

‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव- शिवसेना