राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांना गोव्यामध्ये खंबीर पाठिंबा देण्यास शिवसेना उत्सुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सुभाष वेलिंगकरांनी योग्य प्रस्ताव दिल्यास गोव्यामध्ये युती करण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली आहे. मात्र वेलिंगकरांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी शिवसेनेची इच्छा आहे. वेलंगिकरांनी योग्य प्रस्ताव ठेवल्यास गोव्यामध्ये वेलिंगकरांनी साथ देऊ, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटल्याचे समजते.

यंदाच्या गोव्यातील निवडणुकीमध्ये भाजप सत्तेत येणार नसल्याच्या वक्तव्यानंतर वेलिंगकरांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा प्रमुखपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. गोव्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे आणि इंग्रजी शाळांना मिळणारे अनुदान बंद करावे, अशी वेलिंगकर यांची मागणी आहे. वेलिंगकर यांच्या या मागणीला शिवसेनेने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यातील राजकारणात नवा अध्याय सुरु करण्याचा मानस ठेवणारे वेलिंगकर आणि शिवसेना भाजप विरोधात एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात रविवारी गोव्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती. संजय राऊत यांनी या भेटीला दुजोरा दिला होता. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले होते.

सुभाष वेलिंगकर यांचे गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभारणीत मोलाचे योगदान आहे. १९९६ मध्ये विभाग संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी १० महिन्यांचा कारावासही भोगला होता. मनोहर पर्रिकर, श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाटचालीत वेलिंगकर यांनी भरीव योगदान दिले आहे.