उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनामध्ये काँग्रेसची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने रोड शो करणाऱ्या राहुल गांधीच्या दिशेने सोमवारी बूट भिरकावण्यात आला. सीतापूरच्या रॅलीदरम्यान हा प्रकार घडला. राहुल गांधी उघड्या जीपमधून गर्दीला अभिवादन करत असताना हा प्रकार घडला. यावेळी गाडी मंदगतीने पुढे सरकत असल्यामुळे राहुल यांना बूट लागला नाही. दरम्यान राहुल यांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव तसेच त्याने हा प्रकार का केला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
उत्तर प्रदेश निवडणुकीमधील विजयासाठी काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ‘खाट सभा’ या प्रचार अभियानाचे नियोजनाने सुरुवात केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘खाट सभा’ या प्रचार अभियानाची सुद्धा जोरदार चर्चा रंगली होती. सभेनंतर शेतकऱ्यांनी खाट चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता. याची चर्चा चांगलीच रंगली होती.
राजकीय व्यक्तीवर बूट फेकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान बूट फेकण्यात आला होता. केजरिवालांसोबत काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर काँग्रेस नेते पीसी चाको यांनी ही घटना केजरीवालांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता राहुल यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.