जम्मू-काश्मीरमधील काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागात प्रत्येकी दोन अशा चार ठिकाणी सध्या दहशतवाद्यांसोबत सुरक्षारक्षकांची चकमक सुरु आहे. दरम्यान, शोपिया जिल्ह्यातील केलर भागात आज पहाटे केलेल्या कारवाईत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली. अद्यापही येथे कारवाई सुरुच आहे.

दरम्यान, हंदवाडा येथील यारू भागात काही दहशतवादी लपून बसले असून येथील अद्याप चकमक सुरु आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागाला वेढा दिला असून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या ठिकाणी दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी दक्षीण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील कुगेर भागात कासोजवळ बुधवारी मोठा हिंसाचार झाला होता. आंदोलनकर्त्यांनी सुरक्षारक्षकांवर पेट्रोल बाँब फेकले होते. यामुळे एका गोशाळेला आग लागली होती. हिंसक आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी गोळीबार करावा लागला होता. यामध्ये फैजान अहमद आणि सुहैल नजीर भट हे दोन तरुण जखमी झाले होते.