खासगी वाहनांच्या मोडतोडीचे प्रकार

श्रीनगर : घटनेचा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर गुरुवारी ४६ व्या दिवशीही काश्मीरमधील सामान्य जनजीवन विस्कळीत होते. समाजकंटकांनी दुकानदारांना धमक्या दिल्याचे आणि खासगी वाहनांची मोडतोड केल्याचे प्रकार काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी घडले.

समाजकंटक ‘बंद’साठी बळजबरी करत असल्यामुळे अनेक ठिकाणी खासगी मोटारींवर दगडफेक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारांची नोंद घेण्यात आली असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोऱ्यातील बाजारपेठा बंद होत्या आणि सार्वजनिक वाहतूकही सुरू नव्हती. सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा काही दुकाने काही तासांसाठी उघडली होती, मात्र दिवसभर ती बंद होती. सार्वजनिक वाहने रस्त्यांवर नसली, तरी श्रीनगरच्या अनेक भागांत व खोऱ्यात इतर ठिकाणी खासगी मोटारी रस्त्यांवर धावत होत्या. शहराच्या सिव्हिल लाइन्स भागात काही ठिकाणी काही ऑटोरिक्षा व कॅब धावताना दिसत होत्या.

राज्यात सर्वत्र इंटरनेट सेवा अद्यापही बंद आहेत. खोऱ्यातील दूरध्वनी सेवा कार्यरत असल्या, तरी मोबाइल उपकरणांवरील व्हॉइस कॉल्स फक्त उत्तर काश्मीरमधील कुपवाडा व हंदवाडा जिल्ह्य़ांमध्ये सुरू आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे पालक मुलांना घरीच ठेवत असल्याने शाळा सुरू करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरलेले नाहीत.

काश्मीर खोऱ्यातील अनेक भाग निर्बंधमुक्त असले, तरी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दले अद्यापही तैनात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.