नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली असतानाच सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षात गंभीर पेच निर्माण झाल्याचे मत व्यक्त करून ओली यांनी पक्षात लवकरच मोठी फूट पडण्याचे संकेत दिले असल्याचे वृत्त रविवारी येथील माध्यमांनी दिले आहे.

ओली यांनी तातडीने आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आपल्या पक्षातील काही सदस्य अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनाही सत्तेवरून दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे ओली यांनी मंत्र्यांना सांगितल्याचे वृत्त ‘माय रिपब्लिका’ वृत्तपत्राने ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

आता पक्षाच्या अध्यक्षपदावरून आणि पंतप्रधानपदावरून आपल्याला दूर करण्यासाठी कट रचण्यात येत आहे, मात्र आपण तसे होऊ देणार नाही. सत्तारूढ पक्षात गंभीर पेच निर्माण झाला आहे, असेही ओली यांनी शनिवारी सांगितले.

ओली यांच्या वक्तव्यानंतर पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, माधव नेपाळ आणि झालालंथ खानल या तीन माजी पंतप्रधानांनी भंडारी यांची भेट घेतली आणि त्यांना पदावरून दूर करण्यासाठी कट रचण्यात येत असल्याच्या पसरलेल्या अफवा खऱ्या नसल्याचे स्पष्ट केले, असे वृत्त ‘द काठमांडू पोस्ट’ने दिले आहे.