टेनिस जगतात अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘विम्बल्डन’ सामन्याबाबतची एक फेसबुक पोस्ट सध्या अनेकांच्या भुवया उंचावत आहे. एका टेनिस चाहत्याने तक्रार करणाऱ्या आशयाची पोस्ट करत ऑनलाइन वर्तुळात खळबळ माजवली आहे. विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठीच्या रांगेतून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचे या वीस वर्षीय शीख तरुणाने म्हटले आहे. ही घटना जातियवादाला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप करत, विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगेत उभे असणाऱ्या इतरांना आपण त्रास देत असल्याचे कारण देत आपल्याला रांगेतून त्वरितच बाहेर येण्यास सांगितल्याचे त्याने म्हटले आहे. तो प्रसंग फारच भयंकर होता, असे सांगत ‘आपली चुक तरी काय आहे?’ याबाबत विचारणा करण्याची आपली इच्छा असूनही आपण त्यावेळी शांतपणे रांगेतून बाहेर पडणे योग्य समजले, असे मत त्याने मांडले. स्वत: टेनिसपटू असलेल्या या शीख तरुणाने ‘एक दिवस विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर खेळण्याची इच्छा व्यक्त करत, ही स्पर्धा पाहणे हे माझेही स्वप्न होते; पण या प्रसंगामुळे माझे मन नक्किच विचलित झाले आहे’, अशीही प्रतिक्रिया दिली.
या तरुणाच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी स्वत:ची मते मांडत भेदभावाच्या या घटनेची रितसर तक्रार करावी असा सल्ला दिला आहे. ‘या तरुणाविषयी रांगेतील इतरांनी केलेल्या तक्रारीनंतरच त्याला रांगेतून बाहेर येण्यास सांगितले होते’ अशी भूमिका विम्बल्डनच्या प्रवक्त्यांनी याविषयी बोलताना मांडली. दरम्यान, आपल्यावरील आरोपांचे शीख तरुणाने खंडण केले आहे.