बरखास्त झालेल्या नियोजन आयोगाच्या सचिव सिंधुश्री खुल्लर यांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप केंद्र  सरकारने आदेश जारी केले नसले तरी लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
१९७५च्या तुकडीच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या खुल्लर यांनी एप्रिल २०१२मध्ये नियोजन आयोगाच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतली होती. ३१ मार्च २०१३ रोजी निवृत्तीनंतर त्यांची दोन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आता नियोजन आयोग बरखास्त केल्यानंतर त्यांची नीती आयोगाच्या सचिवपदीही नियुक्ती होणार असल्याचे समजते.
केंद्र सरकारने सोमवारी अर्थतज्ज्ञ अरविंद पानगढिया यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. बिबेक देबरॉय आणि व्ही. के. सारस्वत यांची आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुरेश प्रभू व राधामोहन सिंग यांना आयोगाच्या पदसिद्ध सदस्य म्हणून नेमण्यात आले.