पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ची निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी परदेशातून काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाला १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर अमित शहांनी तो एक ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगत सारवासारव केली होती. त्यामुळेच भारतीयांना १५ लाख मिळणार नसले तरी दुसरीकडे सिंगापूरच्या नागरिकांना अगदी १५ लाखांची नाही तरी प्रत्येकी १४ हजारांची लॉटरी लागली आहे. हो कारण सिंगापूर सरकार देशातील वयाची २१ वर्षेपूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला १४ हजार रुपये देणार आहे. आणि त्यामगील कारण म्हणजे देशाचे सर्प्लस (नफ्यातील) अर्थसंकल्प! आणि हा नफा चक्क ४८ हजार कोटींचा आहे.

सिंगापूरचा यंदाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सर्व खर्च वजा जाता १० बिलीयन सिंगापुरी डॉलर (१००० कोटी रुपये) नफा झाल्याची माहिती देशाचे अर्थमंत्री हिंगस्वी केट् यांनी दिली. म्हणून सरकार सर्व नागरिकांना ‘एसजी बोनस’ देणार आहे. कमाईच्या आधारावर सिंगापूरच्या नागरिकांना १०० ते ३०० सिंगापूरी डॉलर (एक सिंगापूरी डॉलर = अंदाजे ५० रुपये) सरकारकडून देण्यात येतील. या रक्कमेला आण्ही ‘हँग्बाओ’ असे नाव दिले आहे. विशेष प्रसंगी देण्यात येणारी आर्थिक रक्कम असा ‘हँग्बाओ’ या मेण्डेरीयन भाषेतील शब्दाचा अर्थ होतो. देशातील वैधानिक मंडळाने अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान आणि मुद्रांक शुल्क म्हणून जमा झालेली रक्कम यामुळे यंदा इतका नफा असणारा अर्थसंकल्प सादर झाल्याचे वृत्त ‘न्यूज एशिया’ वाहिनीने म्हटले आहे.

देशाच्या प्रगतीमधील वाटा नागरिकांपर्यंत प्रत्यक्षात पोहचवण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ७०० मिलीयन सिंगापुरी डॉलर (७० कोटीं रुपयांहून अधिक) इतक्या रकमेचा हा ‘एसजी बोनस’ असणार आहे. ही रक्कम दोन लाख ७० हजार सिंगापूरी नागरिकांमध्ये वाटून देण्यात येणार आहे. महिन्याला २८ हजार सिंगापूरी डॉलर किंवा त्याहून कमी कमाई असणाऱ्यांना प्रत्येकी ३०० सिंगापुरी डॉलर मिळतील. तर २८ हजार ते १ लाख प्रती महिना कमावणाऱ्या नागरिकांना २०० सिंगापुरी डॉलर देण्यात येतील. आणि एक लाखाहून अधिक कमाई असणाऱ्यांना १०० सिंगापुरी डॉलर देण्यात येणार आहेत. त्यानंतरही उरलेली रक्कम रेल्वे सुधारणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा संरक्षण योजनांसारख्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.