प्रत्येकवेळी विविध कारणांवरून आंदोलन करणे सोपे असते परंतु, हाती नेतृत्व आले असताना ते सिद्ध करून पुढे जाणे महत्वाचे आहे. असे म्हणत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोला मारला.
दिग्विजय सिंह आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात, आम आदमी पक्ष संविधानाचा उपहास करत आहेत. उच्च पदावर कार्यरत असताना आंदोलन करून लोकांची गैरसौय करणे निषेधात्मक आहे. उलट, अशावेळी नुसती आंदोलने न करता आपले नेतृत्व सिद्ध करून मार्ग काढणे महत्वाचे असते. आंदोलने करणे सोपे असते. असेही दिग्विजय सिंह म्हणाले.
आंदोलनाचे ठिकाण ठरविणारे सुशीलकुमार शिंदे कोण? – केजरीवाल
दुसऱया बाजूला रेल भवनाजवळ धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ठाम आहेत. दिल्लीचा मुख्यमंत्री मी आहे. मी पाहिजे तिथे धरणे धरण्यास बसेन, आंदोलनाचे ठिकाण ठरविणारे सुशीलकुमार शिंदे कोण आहेत, असा सवाल उपस्थित करत शिंदेंवर केजरीवाल यांनी निशाणा साधला. दिल्ली पोलीसांच्या तीन अधिकाऱयांना निलंबित करण्याच्या मागणीवरून केजरीवाल जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास निघाले असताना त्यांना रेल भवनाजवळ पोलीसांनी अडविले. त्यामुळे तिथेच त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. पोलीसांनी त्यांना आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास सांगितले. मात्र, केजरीवाल यांनी त्यास नकार दिला आणि रेल भवनासमोरच आंदोलन सुरू केले. त्यामुळे रेल भवनाजवळील केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, रेसकोर्स आणि पटेल चौक ही मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत