उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एका पेट्रोकेमिकल कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण होरपळले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

बिजनौर ठाण्याच्या हद्दीतील नगिना रस्त्यावर मोहित केमिकल कारखाना आहे. या कारखान्यात बुधवारी सकाळी बॉयलर फुटल्यामुळे ६ मजुरांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला. त्यावेळी मजूर बॉयलरजवळच काम करत होते.

गेल्या काही दिवसांपासून टँकला गळती असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी मॅकेनिक व मजूर ही गळती बंद करण्यासाठी वेल्डिंगचे काम करत होते. त्याचवेळी मोठा स्फोट झाला व टँक फुटला. त्यावेळी टँकवर उभे असलेल्या मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात पळापळ झाली.

यापूर्वी अशाच पद्धतीची घटना रायबरेली जिल्ह्यात घडली होती. मागील वर्षी रायबरेलीतील ऊंचाहार ठाण्याच्या क्षेत्रातील एनटीपीसी प्लांटमधील बॉयलर फुटल्याने २० हून अधिक लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते.