तामिळनाडूत खाऊ समजून सहा वर्षाच्या मुलाने स्फोटकाचा चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. हे गावठी स्फोटक खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं होतं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचाच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
कावेरी नदीकिनारी मासेमारी करण्यासाठी तिघांनी स्फोटकं आणली होती. यावेळी त्यांनी फक्त दोन जिलेटीन स्फोटक काठ्यांचा वापर केला आणि न वापरलेले पुन्हा घरी आणले. आरोपींमधील एकाचा मुलगा घरात खेळत होता. ही खायची वस्तू असल्याचं समजून त्याने स्फोटकाचा चावा घेतला. यावेली स्फोटकाचा त्यांच्या तोंडातच स्फोट झाला. कोणतीही मदत मिळण्याआधीच घनटनास्थळी त्याचा मृत्यू झाला.
आरोपींनी पोलिसांना कळवलं तर आपण अडचणीत येऊ या भीतीने त्या रात्रीच अंत्यसंस्कार केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली आणि चौकशीला सुरुवात केली. या स्फोटकांना अजून कुठे वापर केला जात होता का याची माहिती पोलीस घेत आहेत.