एकीकडे चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असताना देशभरातील बलात्काराच्या घटना मात्र थांबताना दिसत नाहीयेत. ओदिशामध्ये बिस्किट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार केल्यानंतर तिला शाळेच्या आवारात सोडून देण्यात आलं होतं. पीडित मुलीला गंभीर जखमा झाल्या असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चिमुरडी बिस्किट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. कुटुंबिय तिची घरी येण्याची वाट पाहत असतानाच गावात वीज गेली. मुलगी परत न आल्यानं चिंताग्रस्त कुटुंबियांनी गावकऱ्यांसोबत तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. जवळपास एका तासानंतर त्यांना मुलगी शाळेच्या आवारात बेशुद्द अवस्थेत आढळली. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. डोकं आणि तोंडातून रक्त वाहत होतं. आरोपीला तिचा मृत्यू झालं असं वाटल्याने तसंच सोडून तो पळाला होता.

चिमुरडीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर तिला कट्टकच्या एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्या डोक्याला खोल जखम झाली असून, चेहरा, छाती, गळा आणि गुप्तांगावरही जखमा झाल्या आहेत.

आरोपी हा पीडित मुलीच्या गावातीलच रहिवासी आहे. त्याच्यावर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आजोबांनी दिलेल्या लिखीत तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. डॉक्टरांची १३ जणांची टीम मुलीवर सध्या उपचार करत आहे.