केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आरोप

वस्तू व सेवा कर अपयशी ठरल्याचा दावा करत काँग्रेस नेते सुरतमधील व्यापाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी केला. आगामी निवडणुकीत सुरतची जनता वस्तू व सेवा कराच्या बाजूने कौल देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वस्तू व सेवा कर आणि निश्चलनीकरणामुळे सुरतच्या व्यापाराला अपंगत्व आल्याची टीका केली होती. सुरत हे वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथील व्यापाऱ्यांच्या करासंबंधीच्या सर्व तक्रारी सोडविण्यास आम्ही सज्ज आहोत. वस्तू व सेवा करातील काही त्रुटींमुळे व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत असला तरी नवी थेट करप्रणाली राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे इराणी म्हणाल्या.

मागील सुरत दौऱ्यावेळी इराणी यांनी व्यापारी, कर्मचारी, महिला यांना कर पूर्ततेसाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून काँग्रेस नेत्यांनी येथील नागरिकांना भडकविण्यास सुरुवात केल्याचा आरोप इराणी यांनी केला. बुधवारी सुरत वस्त्रोद्योगातील प्रतिनीधीमंडळ दिल्ली येथे आले आणि त्यांनी वस्तू व कर सेवा प्रणाली त्रासदायक असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले.

नव्या करप्रणालीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर उपाय सांगण्याची मागणीही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आल्याची माहिती इराणी यांनी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्रीपदाचीही जबाबदारी असलेल्या इराणी यांनी वस्तू व सेवा करप्रणालीतील आवश्यक बदल अगोदरच करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

गुजरातमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी ‘जनमत’

अहमदाबाद : गुजरातसाठी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय असावे याबाबत जनतेचे मत जाणून घेण्यासाठी सॅम पित्रोदा राज्यातील पाच शहरांमध्ये नागरिकांना भेटणार आहेत. शिक्षण, आरोग्य, लघुउद्योजकांचे प्रश्न, रोजगार निर्मिती याबाबत जनतेचे मत जाणून घेऊन जाहीरनाम्यात त्यांना स्थान दिले जाणार आहे. अहमदाबाद, बडोदा, राजकोट, जामनगर, सुरत या शहरांना पुढील आठवडय़ात ते भेट देतील. सॅम पित्रोदा हे राहुल गांधी यांचे सल्लागार आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेऊन कोणती उपाययोजना करता येईल याचा विचार केला जाईल असे पित्रोदा यांनी स्पष्ट केले. केवळ गुजरातच नव्हे तर देशात विकासाचे प्रारूप कोणते असावे याचा विचार यानिमित्त होईल, असे पित्रोदा यांनी सांगितले.