मागील काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांची बदली कऱण्यात येणार आहे. सध्याचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्याजागी सोहील महमूद यांची नियुक्ती कऱण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महमूद हे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी असून, त्यांनी याआधी अनेक ठिकाणी तणावाच्या परिस्थितीत काम केलेले असल्याने ते या पदासाठी योग्य असल्याचे म्हटले जात आहे.

महमूद हे १९८५मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले होते. अधिकारी म्हणून ते अतिशय मुत्सद्दी असल्याने उच्चायुक्तपदी चांगल्या पद्धतीने काम करु शकतात, असे पाकिस्तान प्रशासनाने याआधीही म्हटले होते. १९९१ ते १९९४ या कालावधीत महमूद यांनी तुर्कीचे उच्चायुक्त पद सांभाळले आहे. याशिवाय त्यांनी वॉशिंग्टन, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. तर २००९ ते २०१३ या कालावधीत त्यांनी थायलंडमध्येही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

त्यांनी याआधी भारतात काम केलेले नाही. मात्र त्यावर त्यांची नेमणूक अवलंबून नाही. याआधी नियुक्त झालेले बासित, सलमान बशिर आणि शाहीद मालिक यांनीही त्यांच्या कार्यकाळाच्या आधी भारतात काम केले नव्हते. त्यामुळे भारतात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यास भारतात आधी काम केलेले हवे अशी अट नाही.

याशिवाय अफ्रासियाब मेहदी कुरेशी, इफ्तिहार अझिज, तस्निम अस्लम, फारुख अमिल आणि सय्यद इबरार हुसेन हे नवी दिल्लीतील इतर पदांसाठीचे दावेदार असतील.