प्रगत तंत्रज्ञान वापरलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या विमानाचे पहिले उड्डाण सोमवारी स्वित्र्झलड येथे झाले. सोलर इम्पल्स २ असे या विमानाचे नामकरण करण्यात आले असून ते पायरन एरोड्रोम विमानतळावरून उडाले व दोन तासात परत आले.
 एकच आसन असलेले हे विमान ही खरेतर बट्रांड पिकार्ड व आंद्रे बोर्शबर्ग यांची  कल्पना असून हे विमान २०१५ मध्ये जगप्रदक्षिणा करणार आहे. दिवसा व रात्री ते इंधनाशिवाय उडणार आहे. शिवाय त्यात प्रदूषणही शून्य असणार आहे.
 २ तास १७ मिनिटांच्या या व्यावसायिक चाचणी उड्डाणात मार्कस शेरडेल हे वैमानिक होते व त्यांनी या विमानाची चाचणी घेतली. सुरुवातीचे निष्कर्ष गणनानुसार असून येत्या काही महिन्यात त्यांच्या आणखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर त्याचे प्रमाणीकरण करण्यात येईल.  
सोलर इम्पल्सचे सहसंस्थापक बोर्शबर्ग यांनी सांगितले की, हे उड्डाण यशस्वी झाल्याने आता जगप्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे. संपूर्ण संशोधक पथकासाठी हा भावनिक क्षण होता व आमच्या प्रत्येक सहकाऱ्याने त्यासाठी काम केले आहे. यात बऱ्याच प्रमाणात नवतंत्रज्ञान असून त्याची कार्यक्षमता व विश्वासार्हता अधिक आहे. मोठय़ा उड्डाणांसाठीही ते योग्य आहे.
या विमानात लिथियम बॅटरी वापरल्या असून त्यांचे वजन ६३३ किलो आहे त्यामुळे ते रात्री सूर्यप्रकाशाविनाही उडू शकते.

सोलर इम्पल्स २
१. सोलर इम्पल्स २  हे विमान कार्बन फायबरचे बनवले असून त्याचे पंख ७२ मीटर लांब आहेत.
२. बोईंग ७४७-८ आय या विमानापेक्षा ते मोठे आहे. वजन २३०० किलो आहे जे एका कारइतके आहे.
 ३. पंखांजवळ १७००० सौरघट बसवलेले असून चार विद्युत मोटारी लावलेल्या आहेत.