बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी नव वर्षाच्या प्रारंभीच वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. काही पक्ष जे वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करत आहेत, त्यांनी हे विसरू नये की भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. आपल्याला सर्व धर्मांचा सन्मान करायला हवा. देशात शांतता व सद्‍भावना कायम राखली पाहिजे, असे मायावती यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारद्वारे आणल्या गेलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या जोरदार निदर्शनं होत आहेत, अनेक राज्यांमधील वातावरण तापलेले आहे. या मुद्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक एकवटत आहेत. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींनी देखील सरकारवर टीका केली होती. त्यांनी हे विधेयक असंविधानिक असल्याचे म्हटले होते. एवढेच नाहीतर हे विधेयक सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करत, भविष्यात या विधेयकामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता देखील व्यक्त केली होती.

मी केंद्र सरकारला मागणी करते की, त्यांनी हे असंविधानिक विधेयक मागे घ्यावे, अन्यथा या विधेयकामुळे भविष्यात नकारात्मक परिणाम समोर येतील. केंद्र सरकारने आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण करू नये, जशी की काँग्रेसने या अगोदर केली होती, असे मायावती यांनी म्हटले होते. आमचा पक्ष या मुद्यावर उत्तर प्रदेश विधानसभेत देखील आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.