संपत्तीच्या वादातून एका २३ वर्षीय मुलाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. नंतर तेच कापलेलं मुंडकं घेऊन तो पोलीस स्थानकात हजर झाला तामिळनाडूच्या त्रिची शहरातील पुडूकोट्टाई येथे ही धक्कादायक घटना घडली. आरोपी आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस स्थानकात आला तेव्हा आईच कापलेलं मुंडकं त्याच्या हातात होतं. टी. आनंद (२३) असे आरोपीचे नाव आहे.

आनंद आणि त्याची आई थिलागारानी मारावानपत्ती येथे राहत होते. आनंदचे वडिल थंगाराज यांचे काहीवर्षांपूर्वी निधन झाले. रविवारी सकाळी आनंदचा आई थिलागारानी यांच्याबरोबर संपत्तीवरुन जोरदार वाद झाला. पेशाने बांधकाम मंजूर असलेला आनंद घराच्या वाटणीवरुन अनेकदा आईबरोबर वाद घालायचा. थिलागारानी यांना त्याची मागणी मान्य नव्हती.

रविवारी याच कारणावरुन वाद झाल्यानंतर आनंदने रागाच्या भरात चाकूने आईवर वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आईचं मुंडकं कापलं व तेच मुंडकं हातात घेऊन तो कारामबाकुडी पोलीस स्थानकात गेला. आनंदच्या हातातल मुंडकं पाहून पोलिसांना धक्का बसला. त्यांनी लगेच आनंदला अटक केली व घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पुडूकोट्टाई येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.