काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना तुरुंगात जाण्याची वेळ येणार नाही, याची पुरेपूर काळजी सत्ताधारी भाजपने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याची पटकथा शुक्रवारीच लिहिण्यात आल्याचेही सांगण्यात आले. राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांच्यासमवेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पुढील आठवडय़ात कामकाज सुरळीत पार पाडण्यावर काँग्रेसने सहमती दर्शवली होती. त्यापूर्वीच सोनिया व राहुल गांधी यांनी जामीन घेण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढाकार घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
काँग्रेसमधील समव्यावसायिक वकील मित्रांशी बोलून जेटली यांनी काँग्रेस नेत्यांपर्यंत योग्य निरोप पोचता करून राज्यसभेचे कामकाज किमान तीन दिवस तरी पार पडेल, याची व्यवस्था केली. सोनिया व राहुल गांधी यांनी जामीन न घेणे सरकारसाठी डोकेदुखी ठरली असती. त्यामुळेच सरकारने जेटलींमार्फत सध्या तरी हे प्रकरण मिटवण्याचा संदेश काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचवला, अशी माहिती सूत्रांनी दिली.जेटली यांना मध्यस्थीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच विनंती केल्याचे समजते. यापूर्वी विरोधकांना समजावण्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. त्यामुळे जेटली यांनी सरकार व काँग्रेस पक्षात मध्यस्थी केली. परंतु हा समझोता केवळ २० फेब्रुवारीपर्यंतच टिकणार असल्याचे सांगण्यात येते. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाची सुनावणी आता २० फेब्रुवारीला होणार असल्याने सरकारसाठी महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे भवितव्यदेखील अधांतरीच आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच काँग्रेसची रणनीती ठरेल.