सोनियांच्या उपस्थितीत नेत्यांची बैठक

नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एमआरसी), देशासमोरील आर्थिक संकट या दोन प्रमुख मुद्दय़ांवर भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय शुक्रवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक मुद्दय़ावर ५ ते १५ नोव्हेंबर या काळात काँग्रेस देशभर आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे संघटना महासचिव के. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये तुलनेत उत्साह निर्माण झाला असून भाजपच्या धोरणांविरोधात आगामी रणनीती काय असेल यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षाच्या १७ नेत्यांच्या विशेष गटाची बैठक बोलावली होती. दिवाळीनंतर १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर याकाळात संसदेचे हिवाळी अधिवेशन होत असून त्यात कोणकोणते मुद्दे ऐरणीवर आणले पाहिजेत यावरही सोनिया गांधी यांनी नेत्यांची मते जाणून घेतली.

प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहकार्य (आरसीईपी) या चीनसह १६ देशांमधील खुल्या व्यापाराला चालना देणाऱ्या करारात भारतही सहभागी होणार असून त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. चिनी आयातीचे उदारीकरण होण्याचा धोका असून भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसेल अशी टीका जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली. आरसीईपी धोरणाविरोधातही काँग्रेस आंदोलन करणार आहे. सोनिया गांधी यांचे निवासस्थान दहा जनपथवर सकाळी झालेल्या या बैठकीला मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव, सुष्मिता देव, रणदीप सुरजेवाला आदी १७ नेते उपस्थित होते. मात्र, यात प्रियंका गांधी-वड्रा यांचा समावेश नव्हता.

राहुल अधिक ताकदीने परतील- अ‍ॅण्टनी

सोनिया गांधी पक्षप्रमुख आहेत आणि पक्षाला त्यांची गरज असेपर्यंत त्या पक्षाचे नेतृत्व करत राहतील. राहुल गांधीही पक्षात कार्यरत राहणार आहेत. ते अधिक ताकदीने परततील. शिवाय, राहुल पक्षाच्या विविध कार्यक्रमांत आणि आंदोलनात सहभागी होत आहेत, असे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी म्हणाले. काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षासारखा आहे, असे नमूद करून अ‍ॅण्टनी म्हणाले की, काँग्रेस पराभूत झाला तर गांधी घराण्यामुळे (सोनिया-राहुल) हार पत्करावी लागली अशी टीका केली जाते आणि आता विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे तर ते राजकीय परिस्थितीमुळे असा युक्तिवाद केला जातो. पण, (गांधी कुटुंबाला श्रेय न देण्याचा) हा युक्तिवाद लोक मान्य करणार नाहीत!