कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी बोधगयामध्ये महाबोधी मंदिराला भेट दिली. गेल्या रविवारी मंदिरामध्ये पहाटेच्यावेळी दहा साखळी स्फोट झाले होते. त्यापार्श्वभूमीवर या दोघांनी मंदिराची पाहणी केली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी मंगळवारी महाबोधी मंदिराला भेट दिल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारवर टीका केली होती. दहशतवादाचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राजनाथसिंह यांनी ठेवला होता. त्यानंतर दुसऱयाच दिवशी सोनिया गांधी यांनी महाबोधी मंदिराला भेट दिली.
महाबोधी मंदिरात झालेल्या स्फोटांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएचे पथक स्फोटांचा सर्व बाजूने तपास करीत आहे. सबळ पुरावा हाती मिळाल्याशिवाय कोणालाही अटक करण्यात येणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. दरम्यान, संशयावरून मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची बुधवारी सुटका करण्यात आली. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या चौघांविरुद्ध कोणतेच पुरावे न सापडल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.