दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे १८,००० फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर आज (शनिवार) पहाटे हिम कडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दबललेल्या गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलिकॉप्टरच्या मदतीने काम सुरु केले आणि जवानांना बाहेर काढले. मात्र, यांतील दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी देखील सियाचीन ग्लेशिअरमध्ये अशाच प्रकारे एक गस्ती पथक हिमस्खलनाच्या तावडीत सापडले होते. यामध्ये चार जवान शहीद झाले होते तर दोन पोर्टर्सचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गस्ती पथकातील ८ जवान आणि पोर्टर बेपत्ता झाले होते.

सियाचीन ग्लेशिअर ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे.