नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत गदारोळ केल्याने आज गुरुवारी सातव्या दिवशीही कामकाज होऊ शकलेले नाही. विरोधकांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आग्रह धरला. अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्याने एका खासदाराने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागदाचे तुकडे फेकले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांचा गदारोळ न थांबल्याने अखेर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी लोकसभेचे कामकाज सुरू झाले. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नियमानुसार कामकाज पुकारले. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा करावी, असा आग्रह धरला. विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ केला. मात्र, लोकसभा अध्यक्षा महाजन सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचे आवाहन विरोधी पक्षाच्या सदस्यांना करत होत्या. मात्र, तरीही नोटाबंदीवरील चर्चेसाठी विरोधी पक्षांचे सदस्य आग्रही राहिले. अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यावर पुन्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि त्या आपल्या आसनावरून उठून निघून जात होत्या. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागदाचे तुकडे फेकले. यादव यांच्या या कृत्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी खूपच संताप व्यक्त केला. या प्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार आणि राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांवर कागदाचे तुकडे फेकणाऱ्या खासदार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्याने लोकसभेचे कामकाज आज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. नोटाबंदीच्या मुद्द्यावर विरोधकांनी चर्चेसाठी आग्रह धरला होता. मात्र लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यावेळी खासदार यादव यांनी महाजन यांच्यावर कागदफेक केली. विरोधकांच्या गोंधळामुळे अखेर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. १२ वाजल्यानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. पण विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पुन्हा लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रामनरेश यादव यांच्यासह कर्नाटकातील डॉ. एम. बालामुरलीकृष्ण यांच्या निधनाची सूचना दिली. तसेच अफगणिस्तानची राजधानी काबूल येथे मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला. यानंतर संसदेतील सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहात प्रार्थना केली.