जेएनयू वसतिगृहातील बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी विशेष तपास पथकाची स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या आदेशावरून हे पथक स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या गटाने संकुलात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त  पोलीस उपायुक्त-२ (दक्षिण) मनिषी चंद्र यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची आम्ही स्थापना केली आहे, त्याचप्रमाणे संबंधित पोलीस अधीक्षक आणि देशभरातील पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही दिल्या आहेत, असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त-१ (दक्षिण) नूपुर प्रसाद यांनी सांगितले.

गेल्या शुक्रवारी रात्री विद्यापीठाच्या संकुलात काही विद्यार्थ्यांशी झालेल्या बाचाबाचीनंतर गेल्या शनिवारपासून नजीब अहमद हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे.

नजीब याच्याबद्दल माहिती देणाऱ्यासाठी आम्ही ५० हजार रुपयांचे इनामही जाहीर केले आहे, असे प्रसाद म्हणाल्या. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी, अशा सूचना राजनाथसिंह यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. दरम्यान, बुधवारी दुपारी जेएनयूमधील आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी कुलगुरू एम. जगदीशकुमार आणि अन्य १२ अधिकाऱ्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये डांबून ठेवले होते. जेएनयू प्रशासनही नजीब याचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, नजीबचा शोध कोठे घेण्यात आला त्या ठिकाणांची माहिती सांगण्यास प्रसाद यांनी नकार दिला.

नजीब बेपत्ता झाल्यापासून त्याचे अपहरण झाल्याची वर्तविण्यात येत असलेली शक्यता प्रसाद यांनी फेटाळली. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाही, मात्र नजीब हा पार्थसारथी रॉक्स परिसराबाहेर जात असताना त्याला प्रत्यक्षदर्शीने पाहिले, असे प्रसाद म्हणाल्या. त्याच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी करणारा दूरध्वनी आला होता, असेही त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. वसतिगृहात नजीब ज्या खोलीत राहात होता तेथून आम्ही काही औषधे, लॅपटॉप आणि त्याचा भ्रमणध्वनी ताब्यात घेतला आहे, या वस्तू नजीब तेथेच सोडून गेला होता, असेही त्या म्हणाल्या.