बिहारची राजधानी असलेल्या पाटण्याच्या ग्रामीण भागात पंधरा दिवसांपूर्वी एका सॉफ्टवेअर अभियंत्या वराचा करोना संसर्गाने ताप येऊन मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहावर चाचणी न करताच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे नंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांकडून करोनाचा प्रसार झाला. एक प्रकारे हा विवाह समारंभ करोनाच्या प्रसारास कारण ठरला आहे.

पाटणा जिल्ह्य़ातील पालीगंज तालुक्यात हा विवाह समारंभ झाला होता. तेथे शंभर लोकांना लागण झाली आहे. संपर्कातील ३५० व्यक्तींची तपासणी  करण्यात आली होती. या वराच्या पंधरा नातेवाईकांना करोनाचा संसर्ग झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवरदेव गुरुग्राममध्ये सॉफ्टवेअर अभियंता होता आणि विवाहासाठी मे महिन्यात घरी आला होता.‘तिलक’ कार्यक्रम झाला त्यानंतर त्याला करोनाची लक्षणे दिसली. १५ जूनला त्याचे लग्न होते तेव्हा तो तापाने फणफणलेला होता. विवाह समारंभ लांबणीवर टाकण्याची त्याची इच्छा होती, पण कुटुंबीयांनी हटवादाने विवाह केला. त्याला पॅरासिटेमॉल घ्यायला लावून तात्पुरता तापही लपवला. १७ जूनला त्याची स्थिती बिघडली. त्याला पाटण्याच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात नेण्यात आले. तेथे नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

त्याचा मृतदेह घाईघाईने कुणा अधिकाऱ्यांना न कळवता अंत्यविधीसाठी नेण्यात आला, पण कुणीतरी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ही गोष्ट कळवून सगळा प्रकार कथन केला. त्यानंतर मृताचे जे नातेवाईक विवाहास उपस्थित होते त्यांच्या १९ जूनला चाचण्या करण्यात आल्या त्यातील १५ जणांना संसर्ग झाल्याचे दिसून आले. या गावात २४ ते २६ जून दरम्यान विवाहासाठी मंडप घालण्यात आला होता. तेथे आलेल्या ३६४ जणांचे नमुने घेण्यात आले त्यातील ८६ जणांना संसर्ग झालेला होता.

गट विकास अधिकारी चिरंजीव पांडे यांनी सांगितले की, मीठा कुआ, खागरी मोहल्ला, पालीगंज बाजार या भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. पाटणा जिल्ह्य़ास करोनाचा मोठा फटका बसला असून तेथे ६९९ रुग्ण आहेत. पाच बळी गेले आहेत. बिहारमध्ये सोमवारी तेथे ३९४ रुग्ण सापडले. त्यात वीस टक्के पाटणा जिल्ह्य़ातील आहेत.