अयोध्येतील नव्याने बांधली जाणारी मशीद ही मक्केतील काबा शरीफ मशिदीप्रमाणे चौरस आकाराची असेल व या मशिदीला कुणा सम्राटाचे नाव दिले जाणार नाही, असे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव व प्रवक्ते अथर हुसेन यांनी सांगितले.

ते म्हणाले की, धन्नीपूर खेडय़ात १५ हजार चौरस फूट भागात मशीद उभारली जाणार असून ती बाबरी मशिदीच्या आकाराएवढीच असेल. या मशिदीचा आकार इतर मशिदींपेक्षा वेगळा असेल ती मक्केतील काबाच्या चौरसाकार मशिदीसारखी असेल. या मशिदीला काबाप्रमाणे घुमट व मिनार असतील का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, ते असण्याची शक्यता आहे पण यात स्थापत्यविशारदांना स्वातंत्र्य दिलेले आहे. मशिदीला कुठल्या सम्राटाचे नाव दिले जाणार नाही. या मशिदीला धन्नीपूर मशीद म्हणावे असे मला वाटते. मशिदीची विश्वस्त संस्था पोर्टल तयार करीत असून लोक मशीद व  संग्रहालय, रुग्णालय, संशोधन केंद्र यासाठी देणगी देऊ शकतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इस्लामी विद्वानांचे लेखही पोर्टलमध्ये समाविष्ट केले जातील. पोर्टलचे काम अजून बाकी आहे. उत्तर प्रदेश सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने मशिदीच्या उभारणीसाठी  इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. राज्य सरकारने पाच एकराचा भूखंड धन्नीपूर येथे दिला आहे.