श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक व त्यांच्या साथीदारांना गोव्यात प्रवेश करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. श्रीराम सेना नैतिक पोलीसगिरी करते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुतालिक यांची याचिका फेटाळताना सरन्यायाधीश एच. एल. दत्तू व न्या. अमिताव रॉय यांनी सांगितले की, न्यायालयाने गोव्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी घातली असून ती योग्य आहे. गोव्यातील लोक त्यांची स्वत:ची काळजी घेतील. तेथे तुम्ही नैतिक पोलीसगिरी करण्याचे कारण नाही. श्रीराम सेनेने पबमधील मुलामुलींना मारहाण केली होती. त्यामुळे आता बंदी उठवता येणार नाही. सहा महिन्यांनी पुन्हा या, तेव्हा विचार करू. मुतालिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने २ जुलैला दिलेल्या निकालास आव्हान दिले होते. मुतालिक व त्यांच्या साथीदारांवर राज्य पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. तो उठवण्याची मागणी खंडपीठाने फेटाळली होती.