News Flash

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले; २ पोलीस शहीद, १ जखमी

दहशतवादी कारवाया सुरुच

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत दोन पोलीस शहीद झाले आहेत. तर एक जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी काल रात्री श्रीनगरमधील हैदरपोरा येथे पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी झालेले कॉन्स्टेबल शहजाद यांचा मृत्यू झाला. तर दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात घराबाहेरच पोलीस दलातील शबीर अहमद यांना गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

गेल्याच महिन्यात कुलगाम जिल्ह्यात लेफ्टनंट उमर फयाज यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. फयाज हे आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्न असल्याने सुट्टीवर होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. गेल्या महिन्यातही हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी कुलगामध्ये हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बँकेच्या कॅश व्हॅनमधून त्यांना बाहेर काढले आणि त्यांची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, बुधवारी भारतीय सैन्याने जम्मूतील पुंछ जिल्ह्यातील भींबर गली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर तीन ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानने जम्मूमधील नियंत्रण रेषेवर गेल्या चार दिवसांपासून सुमारे १० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे जावे म्हणून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 9:27 am

Web Title: srinagar attacks two policemen killed one cop was injured two separate terrorists attacks srinagar
Next Stories
1 Presidential poll : राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत ‘मेट्रो मॅन’ची एन्ट्री; ई. श्रीधरन NDA चे उमेदवार?
2 दार्जिलिंगमध्ये अस्थिरता
3 कोणतेही गैरकृत्य केलेले नाही!
Just Now!
X