समाजमाध्यमांद्वारे होणारी नकारात्मकता टाळा. तसेच एखाद्या प्रतिक्रियेवर त्याला प्रक्षोभक किंवा कठोर शब्दांमध्ये उत्तर देऊ नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. समाजमाध्यमांचा वापर सकारात्मक व्हावा तसेच सर्जनशीलतेचा वापर करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी सूचना त्यांनी ‘माय गव्ह’शी निगडित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली.
महत्त्वाकांक्षी अशा डिजिटल इंडिया कार्यक्रमाशी निगडित आढावा बैठक झाली त्या वेळी पंतप्रधानांनी सकारात्मक भूमिकेतून काम करण्याचा संदेश दिल्याचे भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अरविंद गुप्ता यांनी सांगितले. आपली विधायक शक्ती देशाच्या प्रगतीसाठी कामी लावा, असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. नकारात्मकता टाळा तसेच एखाद्या व्यक्तीला त्याच प्रक्षोभक भाषेत उत्तर देण्यात आपली ताकद खर्च करू नका, असे पंतप्रधानांनी सांगितल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.