ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे जीवनचरित्र सर्वानाच स्तिमित करणारे व प्रेरणादायी आहे. त्यांचे हे चरित्र आता कॉमिक बुकच्या रूपात येणार आहे, ही बच्चेकंपनीसाठी एक खूशखबर आहे. या कॉमिक बुकमध्ये हॉकिंग यांचे महाविद्यालयीन जीवन, केंब्रिजमधील त्यांचे संशोधन व त्यांचे महत्त्वाचे शोध यांचा समावेश आहे. ‘स्काय न्यूज’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की या कॉमिक बुक मालिकेचे नाव स्टीफन हॉकिंग- काळ व अवकाश यांची कोडी असे असून त्यात हॉकिंग एक माणूस, मिथक व आख्यायिका या अनुषंगाने विचार केला आहे.
कॉमिक बुक कलाकार झ्ॉश बॅसेट यांनी सांगितले, की या कथेचा नायक असलेला हा वैज्ञानिक चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे जरी आज ते चालू फिरू शकत नसले तरी मनाने ते तरुण आहेत.
आपल्या काळातील एक महान वैज्ञानिक असलेल्या स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेणे व त्यांनी मांडलेल्या अमूर्त संकल्पना या दृश्यात्मक व गतिशील पद्धतीने मांडणे हा आमचा यातील हेतू आहे असे त्यांनी सांगितले. हॉकिंग हे जिवंतपणीच दंतकथा बनले आहेत. त्यांच्यावर कॉमिक बुक करायला मिळणे हा माझा सन्मान झाला आहे असे मी समजतो. त्यांचे ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे पुस्तक, विश्वाचे स्वरूप वैज्ञानिक नसलेल्या लोकांनाही सोप्या भाषेत निरूपण करते, असे बॅसेट यांनी सांगितले. ब्लू वॉटर प्रॉडक्शनच्या वतीने हे व्यंगचित्र रूपातील कॉमिक बुक हॉकिंग यांच्या जीवनावर बेतण्यात आले आहे. या अगोदर प्रिन्स हॅरी, केटी पेरी व जॉन लेनॉन यांचेही जीवन कॉमिक बुकमधून सादर करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लेखक मायकेल लेंट व ब्रायन मॅकार्थी यांनी सांगितले, की स्टीफन हॉकिंग यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते मिस्कील आहेत, त्यांची विनोदबुद्धी तल्लख आहे. प्रत्येक शोधात त्यांना अगदी लहान मुलांसारखाच आनंद मिळतो. मनाची एकाग्रता मिळवण्याचे श्रेय ते त्यांच्या अपंगत्वाला देतात.हॉकिंग यांना अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस हा विकार जडलेला आहे. तो मोटर न्यूरॉन रोगाचा एक भाग आहे. यात मानवी अवयवांच्या स्वेच्छेने होणाऱ्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या चेतापेशींवर परिणाम होतो. त्यांना जेव्हा हा रोग झाल्याचे निदान झाले त्या वेळी त्यांचे वय २१ होते, ते फार तर काही वर्षे जगू शकतील अशी स्थिती होती, पण त्यांनी वैद्यकीय मते गुंडाळून वयाची ८० वर्षे पार केली आहेत. आपले बहुतांश आयुष्यच चाकाच्या खुर्चीत बसून त्यांनी घालवले. ते संगणकाच्या माध्यमातून संवाद साधतात, कारण त्यांना बोलता येत नाही.

* पुस्तक प्रकाशन कंपनीचे नाव
– ब्लू वॉटर प्रॉडक्शन
* लेखक-मायकेल लेंट व  ब्रायन मॅकार्थी
* चित्रकलाकार- झॅश बॅसेट
* कॉमिक बुकची याअगोदरची पुस्तके- प्रिन्स हॅरी, केटी पेरी व जॉन लेनॉन