एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे खासदार महाबळ मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शीघ्रगती न्यायालयाने शुक्रवारी नव्याने समन्स बजावले. अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्य़ांत मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हात असल्याचा आरोप होता आणि ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नव्याने समन्स बजाविण्यात आले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी मुक्रर करण्यात आली असून त्यावेळी न्यायालयात हजर राहिलेच पाहिजे, असा आदेश न्यायालयाने मिश्रा, त्यांच्या पत्नी ऊर्मिला, कन्या किरण आणि भाऊ हिरा मिश्रा यांना दिला आहे.
मिश्रा आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीबाहेर असल्याने यापूर्वी बजाविण्यात आलेले समन्स त्यांना मिळाले नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. मिश्रा आणि कुटुंबीय न्यायालयात हेतुत: गैरहजर राहिले नाहीत, असे न्यायालयास सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती वीरेंद्र भट यांनी हा युक्तिवाद मान्य केला आणि सदर आरोपींना शुक्रवारी न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा दिली. मात्र पुढील तारखेला त्यांना हजर राहावेच लागेल, असे न्यायालयाने खडसावले आहे.