नवीन पुराव्यांचा समावेश, मालमत्तांची माहितीही

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांना गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये सक्तवसुली संचालनालयाने (इडी) सोमवारी आणखी एक आरोपपत्र दाखल केले.

मुंबईतील विशेष न्यायालयात (पीएमएलए-प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग अ‍ॅक्ट) हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ते पुरवणी आरोपपत्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात नीरव मोदीव्यतिरिक्त इतरांचीही नावे आहेत. काही नवीन पुराव्यांचा समावेशही या आरोपपत्रात आहे. त्याचबरोबर टाच आणलेल्या मालमत्तांची माहितीही त्यात देण्यात आली आहे. या आरोपपत्राविषयीची सविस्तर माहिती अजून हाती आलेला नाही.

मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत भारताने केलेली विनंती ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी तेथील सक्षम न्यायालयाकडे पाठवल्याची माहिती ‘इडी’ने ९ मार्च दिली होती. ‘इडी’ने गेल्या वर्षी मे महिन्यात मोदीवर पहिले आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची चौकशी इडी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत असून  मोदी व त्याचा मामा मेहुल चोकसी हे प्रमुख आरोपी आहेत. त्याची १८७३.०८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यात मोदी व त्याच्या कुटुंबीयांची ४८९.७५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मोदीचा अलीबाग समुद्र किनाऱ्यावरील बंगलाही नुकताच जमीनदोस्त करण्यात आला.

‘दी डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानंतर..

पंजाब नॅशनल बँकेला सुमारे साडेबारा हजार कोटी रुपयांचा गंडा घालणारा नीरव मोदी लंडनमध्ये ८० लाख पौंड किंमतीच्या (सुमारे ७५ कोटी रुपये) आलिशान घरात राहत असून हिऱ्यांचा व्यापार करीत आहे, असा वृत्तांत ब्रिटनमधील ‘दी डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केल्यानंतर दोनच दिवसांनी ‘इडी’ने त्याच्यावर हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.