आणखी १० ते १५ वर्षे काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित असुरक्षित असतील असं जस्टिस (निवृत्त) मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडिया यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. यामुळे काश्मिरी पंडितांच्या जखमा पुन्हा भळभळल्या आहेत. तसंच १९९० मध्ये ज्याप्रकारे हत्याकांड झालं होतं त्याचीही आठवण अनेकांना झाली. असंही मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे.

मार्कंडेय काटजू यांनी ब्लॉगमध्ये काय म्हटलं आहे?

“अजय पंडितांच्या कुटुंबीयांनी १९९० मध्ये काश्मीरमधून पलायन केलं होतं. काश्मिरी पंडितांवर त्या काळात अनेक मोठे हल्ले झाले होते. दोन वर्षांपूर्वी अजय पंडिता हे काश्मीरमध्ये परतले होते. त्यांनी त्यांच्या गावातूनच सरपंचपदाची निवडणूक लढली आणि निवडूनही आले. त्यांना जी मतं मिळाली त्यामध्ये ९५ टक्के मुस्लीम मतंही होती. याचाच अर्थ काश्मीरमधले सगळे मुस्लीम वाईट आहेत असा होत नाही. आजही काश्मीरच्या बहुतांश मुस्लिमांना काश्मिरी पंडितांबाबत काहीही आक्षेप नाहीत. त्यांना काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कल्पना आहे. मात्र काही अल्पसंख्याक लोक हे पंडितांविषयी शत्रुत्त्व मनात बाळगून आहेत. हे सगळे लोक सशस्त्र आहेत. त्यामुळे खेड्यातले लोक हे आपला प्राण जाऊ नये म्हणून गप्प बसतात” असंही काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.